RBI चा पुन्हा दणका; गृहकर्जासह इतर कर्ज महागणार

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.5% वाढ केली. आता रेपो दर 4.90% वर गेला आहे. देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी RBI ने पॉलिसी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. ज्या दराने RBI बँकांना पत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी कर्ज पुरवठा करते त्यातच वाढ केली आहे.

रिझर्व्ह बँकेने महागाईला अटोक्यात आणण्यासाठी रेपो दर मे महिन्यात ०.४० टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. या दरवाढीनंतर ४.४० टक्के रेपो रेट झाला होता. आज ०.५० टक्क्यांनी आणखी रेपो दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता रेपो दर ४.९० टक्के इतका असणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पॉलिसी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली आहे.

तसेच रेपो दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांवर (loan) होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची द्वि-मासिक बैठक ६-८ जून दरम्यान झाली, ज्यामध्ये दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याआधी 4 मे रोजी आरबीआय गव्हर्नरने अर्थव्यवस्थेतील पत प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पॉलिसी रेपो दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.40% करण्याची घोषणा केली होती. सेंट्रल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जगभरातील देशांमध्ये आर्थिक व्यवस्था कमकुवत असूनही भारतीय अर्थव्यवस्थेने ताकद दाखवली आहे. ते म्हणाले की, रेपो दर अजूनही महामारीपूर्व पातळीपेक्षा खाली आहे, शहरी मागणी सुधारत आहे आणि ग्रामीण मागणी देखील हळूहळू सुधारत आहे.