मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तीर्थक्षेत्र आदमापूर ग्रामपंचायतीस लोकप्रतिनिधी व बाळूमामा भक्तांकडून निधी प्राप्त झाल्याची माहिती सरपंच विजयराव गुरव यांनी दिली.

गुरव म्हणाले की, मुंबई येथील सद्गुरू बाळूमामांचे भक्त अँड. देवदत गंगावले यांनी प्राथमिक शाळेला तब्बल ६० लाखांचा निधी दिल्याने या शाळेचा कायापालट होणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने रस्ता डांबरीकरणसाठी पंधरा लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध थरातील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी आदमापूर ग्रामपंचायतीला निधी देत आहेत. जिल्हा परिषद सदस्या रेश्मा राहुल देसाई यांनी आपल्या निधीतून आदमापूर गावास घंटागाडी प्रदान केली आहे. त्यामूळे देवस्थानने आदमापूर ग्रामपंचायतीला विकास कामासाठी दहा टक्के निधीसाठी नकार दिला असला तरी लोकप्रतिनिधी, शासन व सद्गुरू बाळूमामा भक्तांकडून १०० टक्के निधीची पूर्तता झाली आहे. आदमापूरचे सुपुत्र कस्टम अधीक्षक युवराज चौगले यांनी विद्यामंदिर आदमापूरसाठी पंचवीस संगणक दिले आहेत.
आदमापूर येथील रोजगार वाढला पाहिजे म्हणून श्री बाळूमामा देवालयमार्फत अनेक रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आपण एक घर एक नोकरी अथवा दुकान गाळा यासाठीस आपण आग्रही राहणार असून प्रसंगी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई आता सुरु आहे. या सर्व कामांसाठी बाळुमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, उपसरपंच राजनंदिनी भोसले, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य असल्याचे सरपंच गुरव यांनी सांगितले.