पोटच्या ११ वर्षीय मुलाला तब्बल दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडले

पुणे : पोटच्या मुलालाच तब्बल २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडल्याचा अमानुष प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. अत्यंत घाणीच्या ठिकाणी हा ११ वर्षीय मुलगा या कुत्र्यांसोबत अडकला होता. सोसायटीतल्या एका जागरूक नागरिकाच्या ही बाब लक्षात आल्याने या मुलाची सुटका झाली. या मुलाच्या आई – वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हा मुलगा पालकांसह कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होता. या ठिकाणीच त्याला पालकांनी कुत्र्यांसोबत कोंडून ठेवले होते. सोसायटीतल्या एका नागरिकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने चाइल्डलाइन फाउंडेशनला याची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या घरी भेट दिली. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा या घरी गेले असता त्यावेळी घराला कुलूप होते. कार्यकर्त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता हा मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचे दिसले.  त्यानंतर त्यांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली.

बालकल्याण समितीने पोलिसांच्या सहाय्याने या मुलाची सुटका केली आहे. योग्य पोषण न मिळाल्याने हा मुलगा अशक्त झाला असून त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्याचे आई-वडील घरी जेवण बनवत नव्हते. त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी सिलिंडरही नव्हता. व्यवसाय बंद पडल्याने त्याचे पालक बेरोजगार आहेत. घरामध्ये कुत्र्यांनी घाण केल्याने दुर्गंधी पसरली होती. यामधील दोन कुत्रीही मेली होती. तर मुलाला अनेक दिवस अंघोळ घातलेली नव्हती.

चाइल्डलाइन फाउंडेशनच्या अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवले गेले. पण तो कुत्र्यासारखे वागू लागला. तो  इतर मुलांना चावू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला घरात डांबून ठेवले होते. त्याला यामधून बाहेर काढले गेले तेव्हा तो आकाशाकडे तसेच इतर वस्तूंकडे आश्चर्याने पाहत होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.  या मुलाच्या आई – वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.