धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंडे यांची मेहुणी रेणू शर्मा हिला मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. खुद्द धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून रेणू शर्मावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांना ५ कोटी रुपये, दुकान आणि फोन देण्यासाठी धमकावत होती, असा आरोप आहे. रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहीण आहे.

  या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणू शर्माला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘गेली दीड-दोन वर्षे मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मागच्यावर्षी माझ्याबाबत खोटी तक्रार दाखल केली गेली त्यानंतर ती मागेही घेतली. माझी सहनशीलता संपल्यावर मी पोलिसांत तक्रार दाखल केली.’ रेणू शर्माने गेल्यावर्षी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. आता रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्सअॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती. मागण्या पूर्ण न झाल्यास बदनामी करू अशी धमकीही तिने दिली होती. या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तिला तीन लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यानंतर मुंडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांत दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.