कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीचा मानकरी

सातारा : महाराष्ट्र केसरीच्या गदेचा कोल्हापूरकरांचा दुष्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील देवठाणेचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने संपवला. माळशिरसचा मल्ल विशाल बनकर याला ५-४ गुणांनी मात देत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला २२ वर्षानंतर कोल्हापूरला हा मान मिळाला आहे.

देवठाणे (ता करवीर) कोल्हापूरच्या व वर्षभरापूर्वी लष्करात दाखल झालेल्या पृथ्वीराज पाटील याने पुण्याच्या हर्षद कोकाटे वर ८-१ अशी गुणांवर मात करीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. तर अंतिम फेरीत माती गटातून आलेल्या मूळचा बनकर वाडी सोलापूर येथील आणि सध्या मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशाल बनकरवर ५-४ घ्या गुणफरकाने मात केली.

राज्य संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात झाली. या लढतीकडे राज्यभरातील तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले होते. दोन्ही तगडे मल्ल असल्याने एकमेकांमध्ये खडाखडी आणि ताकतीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या फेरीत बनकरने आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या फेरीत पृथ्वीराजने अत्यंत चपळाईने डाव करत ५-४ ने विजय मिळवला.