हद्दवाढ करताना नागरीकरण झालेल्या गावांना प्राधान्य द्या : अजित पवार

कोल्हापूर :  कोल्हापूरची हद्दवाढ करताना शहराजवळील नागरीकरण झालेल्या गावांना आधी सहभागी करून घ्या, एकाचवेळी सर्वांना अंगावर घेऊ नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिला. त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांना तुम्ही सर्वांना विश्वासात घ्या असे सांगून विकासासाठी निधीसाठी  माझ्याकडे कधीही या, निधीची कमतरता पडणार नाही,  असा विश्वास त्यांनी दिला. ‘क्रेडाई’च्या ‘दालन २०२२’ या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. अजित पवार यांनी फित कापून उद्घाटन केले. शाहूपुरी जिमखाना येथे हे प्रदर्शन सुरु झाले आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकासमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, ‘क्रेडाई’चे पदाधिकारी, प्रायोजक, व्यावसायिक व ग्राहक उपस्थित होते. बांधकाम व्यवसायातील बदल, अर्थसहाय्य, नवीन प्रकल्प, बांधकाम क्षेत्रातील नावीन्य, नर्सरी आदी गोष्टींचा ‘क्रेडाई’च्या या प्रदर्शनात समावेश आहे.

‘क्रेडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी स्वागत करून बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न आणि विकास आराखड्यातील अपूर्ण कामांबद्दलची माहिती दिली. दालनचे अध्यक्ष प्रकाश देवलापूरकर यांनीही काही प्रश्न मांडले.

संदर्भ घेऊन पवार म्हणाले, “गेल्या दोन अडीच वर्षांत कोरोना, चक्रीवादळ, महापूर अशा अनेक संकटांतून सरकार जात आहे. तरीही कोल्हापूरच्या जिल्हा नियोजन समितीला नेहमीच निधी दिला आहे. कल्याणकारी राज्य करणारे राजर्षी शाहू महाराज, छत्रपती ताराराणी यांच्या भूमीत आपण आहोत. येथील विकासही झाला पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “कोल्हापूरची तुलना मुंबई, पिंपरी-चिंचवडबरोबर करता येणार नाही. मात्र, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र काही देता येते काय, हे नक्कीच पाहता येईल.”

पवार म्हणाले, “कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी शेजारील नागरीकरण झालेल्या गावांमध्ये गुंठेवारी सुरू आहे, अशा गावांचा आधी समावेश करा. थेट शेतजमिनीतील गावांकडे जाऊ नका तसेच त्यांना दुखवू नका. एकाचवेळी सर्वांना अंगावर घेण्याची गरज नाही. हद्दवाढीत आलेल्या गावांचा विकास केल्यानंतर शेतजमीन असलेली गावे आपण  होऊन पुढे येतील. यासाठी खासदार, आमदारांनी एकत्र येऊन सर्वांना विश्वासात घ्यावे.”

“मी नेहमी विकासाच्या बाजूने आहे. विकासकाम पारदर्शी, नियमात असू दे. कोल्हापूरच्या विमानतळासाठी जे पाहिजे ते देऊ. तेथेही नाईट लँडिंगसह सर्व सुविधा द्या. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ पोलिस ठाण्यांना चांगल्या इमारती दिल्या जाणार आहेत. सर्वसामान्य माणूस जाईल तेथे त्यांना आणि काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही चांगली सुविधा देण्याचे आमचे धोरण असल्याचेही” पवार यांनी स्पष्ट केले.

मंत्री मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळातून देत असलेल्या सुविधांची माहिती देऊन कामगारांची आवर्जून नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. पालकमंत्री पाटील यांनी आकडेवारीद्वारे कोल्हापुरात किती आणि कसा विकास सुरू आहे, हे मांडले. सचिव प्रदीप भारमल म्हणाले, “मागील पाच वर्षांपेक्षा दुप्पट वेगाने शहर विकसित होत आहे. कोविड, महापूर, वादळासारखी स्थिती असतानाही कोल्हापूर वेगाने विकसित होत आहे. तुमच्याकडे जशी मंदी होती, तशीच स्थिती शासनाचीही होती. यावेळी २२६ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंजूर केला. अंबाबाई मंदिरासाठी २५ कोटींचा निधी अर्थसंकल्पात जाहीर केला. रस्ते, ड्रेनेजसाठी मोठा निधी दिला आहे. घरफाळ्यात सवलत देणारी आमची महापालिका राज्यातील पहिली आहे.” ‘क्रेडाई’चे सचिव प्रदीप  भारमल यांनी आभार मानले.

News Marathi Content