नववर्षाची सुरुवात महागाईने; पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची गुढी उंचच उंच!

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष आणि हिंदू नववर्षाची सुरुवात दरवाढीने झाली आहे. 1 एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 253 रुपयांनी वाढ करण्यात आली, तर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज 2 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही 80 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोल, डिझेलच्या महागाईची गुढी उंचच उंच राहिली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 एप्रिलला दिलेला दिलासा हा केवळ एक छोटासा अल्पसा ठरला. कदाचित यालाच एप्रिल फूल बनवणे म्हणतात. १ एप्रिल रोजी न वाढलेल्या किमतीमुळे नवीन आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नाहीत तर कदाचित ते वाढणे थांबेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र हा दिलासा केवळ एका दिवसासाठीच ठरला. सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी 2 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ केली.

कच्च्या तेलाची घसरण तरीही दरात वाढ

युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात प्रचंड गोंधळ उडाला आहे. या काळात एक वेळ अशी आली की कच्च्या तेलाने प्रति बॅरल $१३९ ओलांडले होते, जी २००८ नंतरची सर्वोच्च पातळी होती. पण, शुक्रवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आली. वास्तविक, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या सामुहीक साठ्यातून 180 दशलक्ष कच्चे तेल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ब्रेंट क्रूड एका वेळी 0.31 टक्क्यांनी घसरून 104.40 डॉलर प्रति बॅरलवर आले. WTI क्रूड देखील 1.01 टक्क्यांनी घसरून $99.27 प्रति बॅरलवर आले. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमती त्याच पातळीवर आहेत.