थेट पाईपलाईनच्या घोषणेचे काय झाले : चंद्रकांतदादा पाटील यांचा सतेज पाटील यांना सवाल

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करणारे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शब्द पाळला नाही आणि कोल्हापूरकरांची फसवणूक केली. कोल्हापूरकरांना दाखवलेले थेट पाईपलाईनचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आलेले नाही. प्रत्येकवेळी ते कारणे सांगतात आणि पुढची तारीख देतात. थेट पाईपलाईनच्या घोषणेचे नेमके काय झाले, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला.

 

राज्यात भाजपची सत्ता असताना, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोटयवधी रूपयांचा निधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारासाठी शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात आयोजित केलेल्या, मिसळ पे चर्चा उपक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता गतीमान झालाय. भाजपच्यावतीने आयोजित होणार्‍या प्रत्येक उपक्रमाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आज सकाळी शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी मतदारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कॉंग्रेसच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. आघाडी सरकारच्या काळात सतेज पाटील यांनी राणाभीमदेवी थाटात थेटपाईपलाईनची घोषणा केली होती. थेट पाईपलाईनचे स्वप्न पूर्ण केले नाही तर, मी एकही निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. पण कोल्हापूरकरांचे हे स्वप्न अजुनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे थेट पाईपलाईनच्या घोषणेचे नेमके काय झाले, असा सवाल प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी उपस्थित केला. जाहीर केलेल्या कालावधीत थेट पाईपलाईन योजना पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आणि उलट पालकमंत्री मलाच थेट पाईपलाईनबद्दल विचारतात, हा मोठा विनोद असल्याचा टोला पाटील यांनी हाणला. भाजप सरकारच्या काळात, कोल्हापूर शहराला अमृत योजनेतून ड्रेनेजसाठी ७० कोटी ७७ लाख, पाणी पुरवठा योजनेसाठी ११४ कोटी ८१ लाख, हरीतपट्टा विकासासाठी ४ कोटी ५० लाख असा एकूण १९० कोटींचा निधी दिला. शिवाय रंकाळा संवर्धनासाठी ५ कोटी, शाहू जन्मस्थळ विकासाला २ कोटी ८ लाख, चित्रनगरीसाठी १२ कोटी ५७ लाख, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडयासाठी तब्बल ८० कोटी रूपये दिलेत. गेल्या दोन-अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूर शहरासाठी काय केले, असाही प्रश्‍न प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला. कॉंगे्स आघाडी सरकारने कोल्हापूरकरांवर टोल लादला होता. पण भाजपने कोल्हापुरला टोलमुक्त केले. टोलची पावती फाडणारे टोलमुक्तीबाबत कधी बोलत नाहीत, असा टोलाही आमदार पाटील यांनी पालकमंत्र्यांना लगावला. तसेच भारतीय जनता पक्षात सर्वाधिक महिला आमदार असल्याचे सांगत, छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून, गेल्या ५० वर्षांच्या काळात कॉंग्रेसनी एकही महिला आमदार का दिली नाही, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कॉंग्रेसच्या अपयशावर बोट ठेवत, शहरातील रखडलेल्या योजनांमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितलं. महापालिकेच्या उद्यानात स्वखर्चातून महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव आपण दिला होता. पण केवळ श्रेयवादासाठी महापालिकेनं तो फेटाळला. भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांचे दाखले देत, निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी महेश जाधव, अशोक देसाई, प्रा. जयंत पाटील, अजित ठाणेकर, सुदर्शन सावंत, बाजीराव चव्हाण, मुरलीधर जाधव, अजित हारूगले, विजयसिंह खाडे-पाटील, विश्‍वास पोवार, चंद्रकांत पोवार, सुनील वाळके, वर्षा पोवार, सरिता हारूगले, प्रकाश सरनाईक, जयसिंग पोवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.