पत्नीला भररस्त्यावर विवस्त्र करून अमानुष मारहाण

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून नोकरदार पत्नीला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याची संतापजनक घटना येथील एका रुईकर कॉलनी परिसरात घडली. विवाहितेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

रुईकर कॉलनी परिसरात ही पती-पत्त्नी राहत होते. महिला एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. लग्‍नानंतर या दोघांच्यात वारंवार वाद होत होते. यातून पती तिचा शारीरिक, मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून ती महिला मुलासह जवळच असलेल्या माहेरी रहात होती. बुधवारी रात्री ही महिला नोकरीवरून आल्यानंतर तिला घरी मुले दिसली नाहीत. तेव्हा तिने पतीसह सासरकडील मंडळींशी संपर्क साधला असता मुले घरी असल्याचे सांगण्यात आले. मुलांना घरी नेण्यासाठी महिला सासरच्या घरी  गेली असता पतीने तू घरी का आलीस, अशी विचारणा करीत शिवीगाळ करून रस्त्यावरच विवस्त्र करून मारहाण केली. नागरिकांनी पीडित महिलेची पतीच्या तावडीतून सुटका केली. पतीने चप्पलने चेहर्‍यावर, हातावर मारहाण करून जखमी केल्याचेही महिलेने शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.