महिलांबद्दल आम्हाला नेहमीच आदर; त्यांनी आम्हाला शिकवू नये : धनंजय महाडिक वक्तव्यावर ठाम

कोल्हापूर : प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार धनंजय महाडिक ठाम असून मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसून महिलांचा अवमान केलेला नाही. दोन्ही उमेदवारांची तुलना करा, असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता. मी कोणाचाही अवमान केलेला नाही. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी याचा विपर्यास केल्याचे धनंजय महाडिक सांगितले.

कोल्हापुरात भाजपच्या प्रचार मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाडिक म्हणाले, महाडिक परिवाराने नेहमीच महिलांचा आदर केला आहे. अरुंधती महाडिक, शौमिका महाडिक गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी काम करत असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.

काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने तसेच भाजपच्या उमेदवाराच्याविरोधात बोलण्यासारखा आता कोणताहीच मुद्दा त्यांच्याकडे नसल्यामुळे माझ्या भाषणाचा विपर्यास करत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.