मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
सह्याद्री अतिथीग्रह येथे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. राज्यातील बहुतांशी लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. राज्यात मास्क सक्तीही रद्द करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत.
ठाकरे म्हणाले, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.