माझ्या यशात चंद्रकांतआण्णांची मोठी साथ : फुटबॉलपटू अनिकेत जाधव

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूस भारतीय संघात स्थान मिळावे, अशी स्व.चंद्रकांत जाधव (आण्णा) यांची मनोमन इच्छा होती. ती इच्छा मी पूर्ण केली आहे. मात्र आज आण्णा हयात नाहीत. कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात आण्णांचा वाटा मोठा आहे. माझ्या यशातही आण्णांची खूप मोठी साथ मला लाभली, अशी भावना भारतीय फुटबॉल संघात निवड झालेला कोल्हापूरचा सुपूत्र अनिकेत जाधव याने व्यक्त केली.

भारतीय संघातील स्टार फुटबॉल खेळाडू याचे कर्मभूमी कोल्हापूरात मंगळवारी आगमन झाले. ताराराणी चौकात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी अनिकेतने स्व.चंद्रकांत जाधव यांनी फुटबॉल खेळासाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणी जागवल्या.

अनिकेत पुढे म्हणाला, आण्णा स्वत: फुटबॉल खेळाडू होते. कोल्हापूरच्या फुटबॉलसाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. नवोदित खेळाडूंना आण्णांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या जाण्याने कोल्हापूरचा फुटबॉल पोरका झाला. आण्णांच्या माघारी जयश्रीताईचा फुटबॉलसाठी पाठिंबा आहे. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे फुटबॉल खेळाडूंचा विमा उतरवला जाणार आहे यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री सतेज पाटील यांचे अनिकेतने आभार मानले.

जयश्री जाधव म्हणाल्या, अनिकेतने आण्णांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले असून आण्णांच्या माघारी त्याला आपले पाठबळ कायम राहील.

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महेश सावंत आदी उपस्थित होते.