कोल्हापूर : कसबा बावडयातील जनता सुज्ञ आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील, तर सत्यजित कदम यांच्यासारखा अनुभवी आणि खमका नेता हवा, हे बावडयातील जनतेने ठरवले आहे. त्यामुळेच आज बावडयातून भाजपच्या पदयात्रेला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
महाडिक म्हणाले, कोल्हापूरचे प्रश्न सोडवयाचे असतील, तर सत्यजित कदम यांच्यासारख्या अनुभवी आणि धडाडीच्या उमेदवाराला निवडून देणे ही काळाची गरज आहे. कसबा बावडा म्हणजे स्वाभिमानी आणि जानकार नागरिकांचा प्रभाग असून या निवडणुकीत बावडयातून भाजपला सर्वाधिक मतदान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करून महाडिक म्हणाले, मुळात या निवडणुकीत शिवसेनेला डावलून कॉंग्रेसला जागा गेली. त्यामुळे खरा शिवसैनिक दुखावला असून, त्याचा परिणाम या निवडणुकीत नक्की दिसेल
दरम्यान, कसबा बावडयातील भाजपच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी सत्यजित कदम आणि धनंजय महाडिक यांचे ठिकठिकाणी औक्षण केले आणि पायावर पाणी घालून स्वागत केले. बावडयातील तरूणाईने सुध्दा सत्यजित कदम यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. ज्येष्ठांचा आर्शिवाद घेऊन सत्यजित कदम यांनी या निवडणुकीत विजय मिळवू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. हलगी आणि ताशाच्या गजरात निघालेल्या कसबा बावडयातील प्रचार फेरीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, प्रदिप उलपे, रूपेश पाटील, राजवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.