गोरगरीबांची काळजी घेणारे भाजपचे सत्यजित कदम निवडून येणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर : जनतेच्या कल्याणासाठी सदैव दक्ष असलेल्या आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी असणार्‍या भाजपला निवडून देण्यासाठी कनाननगरमधील नागरिकांनी आता भाजपला पाठबळ दयावे व भाजपचे सत्यजित कदम यांना विजयी करावे,  असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केले. 

भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कनाननगर येथे झालेल्या सभेत त्या बोलत  होत्या. यावेळी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, माजी खासदार धनंजय महाडिक, गायत्री राऊत, सत्यजित उर्फ नाना कदम, विजय जाधव, महेश जाधव, आशिष कपडेकर, नजीर देसाई यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कनाननगरमधील नागरिकांनी या सभेला मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली.

शौमिका महाडिक म्हणाल्या, संपूर्ण जगात कोरोनावरची मोफत लस भारतामध्ये देण्यात आली. कोरोनाकाळात गोरगरीबांची उपासमार होऊ नये, यासाठी रेशनवर मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. गेली दोन वर्ष केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीबांच्या पोटापाण्याची सोय केली. आता कोरोना निव्वळला असला, तरी अजुनही सहा महिन्यासाठी केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याचे सुरू ठेवले आहे. केवळ घोषणाबाजी करणारा हा पक्ष नसून, देशातील जनतेची काळजी घेणारा भाजप पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगात भारताची मान ताठ झाली आहे. अशा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार्‍या सत्यजित उर्फ नाना कदम यांना कोल्हापूर उत्तर मतदार संघातून निवडून देऊया.

भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री असताना, भ्रष्टाचाराला पायबंद होता. जनतेची कामे झटपट मार्गी लागत होती. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची सुरूवात भाजपच्या राज्यात झाली. त्यामुळेच आता पुन्हा राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी कोल्हापूर उत्तरमधून परिवर्तनाला सुरूवात करूया.