दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा शड्डू घुमणार; ४ एप्रिलपासून थरार

मुंबई : दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा शड्डू घुमणार असून ४ एप्रिलपासून साताऱ्यात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे.

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेतला. ६४व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धा ४ ते ९ एप्रिल या कालावधीत साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल.

  महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रातील असंख्य युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची समजली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुस्तीपटू वर्षभर मेहनत घेतात. ही स्पर्धा माती व गादी या दोन विभागात रंगणार आहे. या दोन्ही विभागांत मिळून ९०० कुस्तीपटू सहभाग होणार आहे.

दरम्यान, यापूर्वीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पुण्यात झाली होती. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं लातूरच्या शैलेश शेळकेवर मात केली होती.