नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. भाजपने उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यात एकहाती सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तर पंजाबमध्ये आप पक्षाने सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साफ केला आहे.
देशातील पाच राज्यात पार पडलेल्या या निवडणूकीत पंजाब सोडता मणिपूरसह उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडया चारही राज्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीचे बहुतेक निकाल हाती आले असून पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे.
पंजाबमध्येआप; काँग्रेससह भाजपचाही सुपडा साप
आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साप केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे., पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कांग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला आहे. ११७ जागांपैकी आपने ९२ जागावर दणदणीत विजय मिळवलाआहे. कॉंग्रेसला १८ तर भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
मणिपूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता
मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या ६० जागांसाठीचे बहुते निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत ६० पैकी २८ जागी विजयी झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ९, एनपीपी ८ आणि इतर ८ जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपने पुन्हा सत्ता राखली
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पुन्हा आपली सत्ता कायम राखली आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील ४०३ जागापैंकी २६४ जागांवर जिंकल्या आहेत. समाजवादी पक्ष १३५ जागांवर आघाडीवर आहे. मायावतींचा बसप ४ जागांवर, काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.
गोव्यात पुन्हा भाजपचाच झेंडा
गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. ४० पैकी भाजप २० जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेसला १२ जागांवर विजय मिळाला आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी महा गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपची मोठी आघाडी
उत्तराखंडमध्ये भाजपने ४७ जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष जागांवर आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.