कोल्हापूर: सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल ओसवाल यांनी आज पत्रकारांना दिली.
ओसवाल म्हणाले की, दोन वर्षांसाठी (२०२२-२४) पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम करण्यात आला असून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत २१ ते २४ मार्चपर्यंत, अर्जांची छाननी २५ मार्च, अर्ज तर मागे घेण्याची अंतिम तारीख २८ मार्च आहे. १० एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत संघाच्या महाद्वार रोड येथील इमारतीत मतदान होणार आहे. मतमोजणी ११ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे ७६५ सभासद असून प्रत्येक सभासदाला अध्यक्ष, उपाध्यक्ष व दहा संचालक अशी बारा मते देण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवाराची तीस वर्षे वय पूर्ण असणे गरजेचे असून संचालक पदासाठी वीस वर्षे वय पूर्ण असणे गरजेचे आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी ओसवाल यांनी दिली. यावेळी निवडणूक मंडळाचे सदस्य विजय वशिकर, जवाहर गांधी, बिपिन परमार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.