आंतरराष्ट्रीय उड्डाणे ‘या’ तारखेपासून सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती.

जुलै २०२० पासून, एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि ३७ देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, नवीन आदेशानुसार एअर बबल प्रणालीही संपुष्टात येईल.आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली पडझड यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महाग झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ तसेच मालवाहतुकीला गती मिळणार आहे.