महिला दिनीच काळाचा घाला; डंपरखाली सापडून राशिवडेची महिला ठार

भोगावती : कोल्हापूर-राधानगरी मार्गावर परितेजवळ (ता. करवीर) खडी भरून चाललेल्या डंपरखाली सापडून महिला जागीच ठार झाली. सौ अंजना बळीराम किरूळकर (वय ५५, रा. राशिवडे खुर्द, ता. राधानगरी) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. महिला दिनीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर सुदैवाने त्यांचा मुलगा या अपघातातून बचावला.
याबाबत अधिक माहिती अशी, सौ. अंजना किरूळकर या मुलगा संदीप याच्या मोटरसायकलवरून (एमएच ०९ एफएस ३००६) भोगावती येथे डॉक्टरांकडे डोळे तपासून राशिवडे – येळवडे मार्गे जाण्यासाठी भोगावती येथून निघाल्या होत्या. परितेतील ठिकपुर्ली फाट्याशेजारी किरुळकर यांच्या गाडीच्या पाठीमागून आलेल्या खडीने भरलेला डंपर (एमएच ११ एएल २३९५) मोटर सायकलला ओव्हरटेक करुन जात असताना संदीप याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याच दरम्यान अंजना या उजव्या बाजूला तोल जाऊन डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंजना या गाडीखाली गेल्या त्याच दरम्यान संदीप डाव्या बाजूला पडल्यामुळे तो सुदैवाने अपघातातून बचावला.