दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही; सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : शेतीपंपाला दिवसा वीज देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आम्ही पंधरा दिवस वाट पाहणार. दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

 कृषिपंपांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी कोल्हापुरात धरणे आंदोलन सुरू आहे.  तब्बल १३ दिवसांनी आज शासनाने चर्चेसाठी आमंत्रण दिले होते आज दुपारी तीन आज दुपारी मंत्रालयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली, यावेळी शेतीला दिवसा दहा तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अखत्यारीत असून याबाबत पंधरा दिवसात चर्चा करून निर्णय घेऊ तसेच वीजबिले तात्काळ दुरुस्त करून देण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे, वीज कनेक्शन तोडणी संदर्भात मागील दहा वर्षांपूर्वीची थकबाकी काढण्यापेक्षा शेवटची तीन बिले भरून घेऊन वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

 या बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  दरम्यान, कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात मंगळवारी सकाळी ११ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यासंदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती प्रा. जालंदर पाटील यांनी दिली.