आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे : संजय पाटील

कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.

 राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्याबाबत त्रिसदस्यीय मंत्री समितीच्या शिफारशीवर निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आह्रे. या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांनी कोविड साथीमध्ये  स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता काम केले आहे. कोविड बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंदिवस काम केले आहे. कंत्राटी कर्मचारी कोविड-१९ च्या साथीमध्ये तुटपुंज्या मानधनावर कायम कर्मचा-र्यांसोबत खांदयाला खांदा लाऊन लढाई लढले व लढत आहेत. पण त्यांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नाही. राजस्थान, ओरिसा व तमिळनाडू या राज्यात क्षयरोग विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम केले आहे. त्याच धर्तीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार, कायम कर्मचा-र्याना मिळणा-या सुविधा देऊन शासन सेवेत कायम करावे, अशी मागणी अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.

विशाल मिरजकर, धनंजय परीट, यशोधन कन्नुरे,रणजीत संकपाळ, काजल देसाई, स्मिता पाटील, सुनिता नरदगे, नामदेव सावंत,नानासो पाटील,दिगंबर कुंभार, अभिजित वायचळ,विनायक मगदुम, एकनाथ पाटील यांनी सतत पाठपुरवा केला आहे.