साताऱ्यात वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन

सातारा : सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला विरोधकांसोबतच अनेक संस्थादेखील विरोध करताना दिसत आहेत. साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं.

यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावेदेखील असल्याचं यावेळी ते म्हणाले.“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहे त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.