विदर्भाच्या रेल्वेमार्गाच्या कामाचे इंजिन लवकरच वेग पकडेल

नागपूर : विदर्भाच्या सर्वांगीण विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या २७० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी यावेळी ५४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तर, रेल्वेने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या पिंक बुकच्या डेटावरून २०२२-२३ मध्ये राज्य सरकारकडून २७९ कोटी रुपयांचा वाटा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गाच्या कामाचे इंजिन लवकरच वेग पकडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भातील रेल्वे मार्ग प्रकल्पांचीही दखल घेण्यात आली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत विदर्भासह राज्यातील आणि देशातील नागरिकांसाठी रेल्वेचे आणखी मजबूत जाळे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे विशेष. २०१५ मध्ये वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग मंजूर झाला आणि पुढील वर्षापासून या प्रकल्पाचे काम थेट सुरू होऊ शकले, हे त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला निधी आणि राज्य सरकारकडून आवश्यक असलेला निधी यातून भूसंपादनासंबंधीच्या अडचणी संपतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊन विदर्भासह राज्याचा विकास निश्चित होणार आहे.