समृद्धी द्रुतगती महामार्गाचे काम पूर्ण होण्याची डेडलाईन आता मे महिना

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठमोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षात समृद्धी द्रुतगती महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे कठीण आहे.आता मे महिना ही नवीन ‘डेडलाईन’ ठरविण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील चौदा शहरांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून या महिन्यातच अपूर्ण मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किलोमीटरच्या पट्ट्यापैकी २२ कि.मी. मार्गाचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. जर फेब्रुवारीअखेरीस हा मार्ग वाहतुकीस खुला झाल्यास प्रवाशांना लांब वळसा घालून जावे लागेल, अशी माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

प्रवासी नागपूर ते कारंजा लाड (२१० किमी) प्रवास करू शकतात. परंतु, त्यांना कारंजा लाड ते देऊळगाव राजा (३४१ किमी) हा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने करावा लागेल. देऊळगाव राजा ते वैजापूर दरम्यानचा (४८८ किमी) मार्ग तयार आहे, पण पुन्हा वैजापूर ते शिर्डी हा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने करावा लागेल. समृद्धी महामार्गाचे पहिला टप्पा मे महिन्याअखेरीसपर्यंत तयार होईल, असे गायकवाड यांनी सांगितले.कारंजा लाड आणि देऊळगाव राजा दरम्यानच्या १५ कि.मी.च्या पट्ट्यातील काही पुलांचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. वैजापूर आणि शिर्डी दरम्यान रेल्वे ओव्हरब्रिज आणि गोदावरी नदीवरील पूल मे अखेरपर्यंत पूर्ण होईल.