बांधकाम कामगारांना अर्थसाहाय्य करणाऱ्या तीन नव्या योजनांना मंजुरी…….. हसन मुश्रीफ

कोल्हापूर: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी तीन नव्या कल्याणकारी योजनांची घोषणा कामगार विभागामार्फत करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या सर्व बांधकाम कामगारांना या योजनांचा लाभ होणार आहे. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसाहाय्य, कामगाराचा मृत्यू  आणि अपघात याबाबतच्या या तीन योजना असून या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे बांधकाम मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.    

अशा आहेत योजना……..”

बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेल्या घोषणांनुसार नोंदणीकृत बांधकाम कामगाराला एका मुलीच्या लग्नासाठी ५१,००० रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. जर बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठवण्यासाठी लागणारा खर्च हा मंडळाकडून केला जाणार आहे. तर बांधकाम कामगाराचा हात किंवा पाय निकामी झाला, तर कृत्रिम हात किंवा पाय बसवण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्चदेखील मंडळाकडून केला जाणार आहे.        

कामगारांसाठी विविध योजना………”

मंडळाकडे नोंदीत कामगारांसाठी सध्या विविध प्रकारच्या २९ योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शैक्षणिक साहाय्य, सामाजिक, सुरक्षेसंबंधी, आरोग्यविषयक आणि अर्थसाहाय्याच्या योजनांच्या समावेश आहे. या योजनांमध्ये आता आणखी ३ योजनांची भर पडली आहे.

ऑनलाईन प्रक्रिया…………”

कामगारांची सोय लक्षात घेऊन मंडळाने जुलै २०२० पासूनच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगार हे मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. त्याशिवाय याच संकेतस्थळावर नूतनीकरण आणि विविध योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.           

उपकर निधीतून कल्याणकारी योजना………”

मंडळाकडे जमा होत जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरीता इयत्ता पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येते. याशिवाय अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरीता विशेष साहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसाहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरीता अर्थसाहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरीता अर्थसाहाय्य अशा एकूण २९ कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटपही करण्यात येत आहे.         

लोकप्रिय योजना………”

मंडळामार्फत कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात माध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरीत करण्यात येत आहे. ही योजना कोविड़ विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव कालावधीत होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे. माध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरीता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.