गगन बावडा :दिगंबर म्हाळुंगेकरअसळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पालकमंत्री सतेज ज्ञानदेव पाटील यांची फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी बंडोपंत ज्ञानदेव कोटकर यांची बिनविरोध निवड झाली.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली होती. सोमवारी कारखान्याच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर होते.
या निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, कारखान्याशी निगडीत सर्व घटकांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर चौथ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या विश्वासास पात्र राहून यापुढील काळातही शेतकऱ्यांसह सर्व घटकांच्या हिताचे कामकाज केले जाईल.यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन डॉ. संजय डी. पाटील, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, जयसिंग ठाणेकर, रविंद्र पाटील, प्रभाकर तावडे, धैर्यशील घाटगे, संजय पडवळ, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, अभय बोभाटे, तानाजी लांडगे, वैजयंती पाटील, वनिता देसाई आदीसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब पाटील, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील आदी उपस्थित होते.