शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालय ‘या’ तारखेपासून भरणार ऑफलाईन

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र दि. २४ जानेवारी संपले असून, महाविद्यालयांना सुटी सुरू झाली आहे. दुसरे सत्र दि. २ मार्च रोजी सुरू होणार आहे.

त्यामुळे या दिवसापासून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालये भरणार आहेत.कोरोना, ओमायक्रॉन वाढू लागल्याने शासनाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग दि. ७ जानेवारीपासून ऑनलाईन भरण्यास सुरू झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ऑफलाईन सुरू झाल्या. त्याच दिवशी शासनाने दि. १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी दिली. पण, विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक सत्र या वर्षी दि. १ ऑक्टोबरपासून सुरू झाले. हे सत्र दि. २४ जानेवारीला संपले.त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाविद्यालयांना सुटी सुरू झाली असून, ती १ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे शासनाने जरी वर्ग ऑफलाईन भरविण्यास परवानगी दिली असली, तरी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग प्रत्यक्षात दि. २ मार्चपासून भरणार आहेत. महाविद्यालयांतील वर्ग भरणार नसले, तरी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून पदवी प्रथम वर्षाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षा सुरू होणार आहेत. त्या दि. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.