राज्यातील टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात धक्कादायक बाब समोर

राज्यातील टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परीक्षेत अपात्र ठरलेल्या 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

टीईटी घोटाळा प्रकरणाचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचा मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी केली. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. मूळ निकाल आणि जाहीर निकालाची पडताळणी केली असता अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे समोर आले. 2018 मधील परीक्षेमध्येही मोठय़ा प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून, त्याची पडताळणी सुरू आहे.पुणे सायबर पोलीस सध्या 2018 आणि 2020 मधील टीईटी घोटाळय़ाचा तपास करत आहेत. या परीक्षेमध्ये 2013 पासूनच घोटाळा होत असल्याचा आरोप होत असल्याने मागील आठ वर्षांचे निकाल आणि प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.