नाशिक : गेल्या वर्षभरापासून द्राक्ष बागांवर सुरु असलेली संकटाची मालिका आता द्राक्षांची तोडणी सुरु असताना दुपटीने वाढलेली आहे. वातावरणात होत असलेला बदल आता थेट उत्पादनावरच परिणाम करणारा आहे.
द्राक्ष बागांमधील वातावरण उबदार रहावे म्हणून शेतकरी रात्रीचा दिवस करुन शेकोट्या पेटवत आहे पण थंडीचा जोर अधिकच वाढत असल्याने (Grape) द्राक्षांची फुगवण तर थांबली आहेच पण मणी तडकण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हा हतबल होताना पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत कीड-रोगराईच्या सुरक्षतेसाठी वेळोवेळी फवारणीची कामे केली पण आता थेट घडावरच परिणाम होत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका कायम आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लहर असून निफाडचा पारा 4.5 अंशावर आहे.द्राक्षाला घड लागण्याच्या अवस्थेपासून या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष बागांवर झालेला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुले मिल्ड्यू रोगाचा धोका वाढला होता. यावर बुरशीनाशक फवारुन शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले मात्र, सध्याच्या अवस्थेत शेतकऱ्यांना काहीच करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव होण्यासाठी शेकोट्या पेटवून घड सुरक्षित ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.