कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कृषी पतपुरवठा क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी पुन्हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उपाध्यक्ष पदी कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे यांची वर्णी लागली.
गेली पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मुश्रीफ यांच्याकडेच होते. आमदार राजू आवळे माजी मंत्री जयंवतराव आवळे यांचे पुत्र आहेत. त्यांनी या आधीही बँकेच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. यानंतर पुन्हा एकदा त्यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली.मंत्रीपदाच्या कामाचा व्याप असल्याने अध्यक्ष पद नको अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी घेतली होती. त्यातच कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनीही अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र मंत्री मुश्रीफ यांनीच अध्यक्षपद घ्यावे, असा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दबाव होता, अखेर मंत्री मुश्रीफ यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.