मराठी भाषिकांवरील राज्यद्रोहाचे खटले मागे घेण्याची शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळवुन देण्यासाठी राज्यद्रोहाचे गुन्हे दाखल करत अटक केलेल्या मराठी भाषिकांची त्वरीत मुक्तता करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास शनिवार 22 रोजी कोल्हापूर ते बेळगांव असा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्च काढत तरुंग मुक्ती आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला.

तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी कितीही अडवणूक केली तरी एक हजार शिवसैनिक बेगळगांवमध्ये दाखल होतील आणि मराठी भाषिकांच्या अटकेसंदर्भात बेळगांव जिल्हा प्रशासनाला जाब विचारतील असेही देवणे यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख देवणे म्हणाले, बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्य़ाचा काही कन्नड गुडांनी अवमान केला. याचा निषेध नोंदविण्यासाठी बेळगांवमध्ये रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांची धरपकड करत कर्नाटक प्रशासनाने 61 जणांवर राज्यद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता अथवा कोणीही जखमी नसताना मराठी भाषिकांनी शांततेत निषेध नोंदवूनही त्यांच्यावर राज्यद्रोहाचे खटले कशाचे आधारे नोंद केले. तसेच अद्यापही अटक केलेल्या मराठी बांधवांची सुटका न झाल्याने संतप्त झालेल्या कोल्हापुरातील शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. पत्रकार परिषदेला शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, वैभव जाधव, अवदेश करंबे, अमित सोलापूरे आदी उपस्थित होते.