विना हेल्मेटस्वारांना आजपासून ५००रुपये दंड

नाशिक : संस्थेच्या आवारात विनाहेल्मेट प्रवेश दिल्यावरून महाविद्यालयांसह अन्य संस्थांचे मालमत्ता अधिकारी आणि प्राचार्यावर कारवाईचा बडगा उगारणारी पोलीस यंत्रणा रस्त्यांवरून हेल्मेटविना भ्रमंती करणाऱ्यांवर कारवाईस बगल देत असल्याकडे नाशिक शहर पोलिसांनी आता हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांवर मंगळवारपासून ५०० रुपये दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनधारकांना समुपदेशन, परीक्षेबरोबर आर्थिक भारही सहन करावा लागणार आहे. अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. त्याअंतर्गत प्रारंभी हेल्मेटशिवाय वाहनात इंधन देण्यास बंदी घालण्यात आली. त्याचा प्रभाव दिसत नसल्याने मग शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, लष्करी आणि औद्योगिक क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी हेल्मेटविना येणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रवेशास प्रतिबंध करण्याचे आदेश निघाले. कार्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेश दिल्यास संबंधित मालमत्ताधारकास जबाबदार धरण्याचे पोलिसांनी जाहीर केले.