सोलापूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बार्शी शहरात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असलेला विशाल अंबादास फटे स्वत:हून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. त्यास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांत हजर होण्यापूर्वी एका चित्रफितीच्या माध्यमातून फटे याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत ‘तो मी नव्हेच ’ चा पवित्रा घेतला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात विशाल फटे (वय ४५) हा फरारी होता. तर त्याचे वडील अंबादास गणपती फटे (वय ७०) आणि भाऊ वैभव फटे (वय ४०) हे दोघे अटकेत आहेत. त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याशिवाय फटे याची पत्नी राधिका आणि आई अलका यादेखील आरोपी असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. रात्री आठच्या सुमारास विशाल फटे हा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वत: पायी चालत येऊन हजर झाला. यावेळी त्याच्या हातात पिशवी होती. तत्पूर्वी, फरारी असताना विशाल फटे याने आपल्यावरील आर्थिक फसवणुकीचे सर्व आरोप एका चित्रफितीच्या माध्यमातून फेटाळले. त्याने स्वत:चे म्हणणे मांडलेली चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली आहे.