वाढलेल्या खताच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई : रब्बी हंगामासाठी खतांची मागणी वाढलेली असताना खतांच्या किमतीत प्रत्येक पिशवीसाठी ५० ते १९५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सारे गणित बिघडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे केली आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पेरणी केलेले गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांसाठी जानेवारीत खतांची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये पिके काढणीस येण्यापूर्वी चांगल्या उत्पादनासाठी जानेवारीदरम्यान शेतकरी खतांचा वापर करतात़. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खत उत्पादकांनी रब्बीसाठी खतांच्या किमती जाहीर केल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक खतांच्या किमतीत वाढ झाली. १०:२६:२६ या खताची पिशवी १४७० रुपयांना मिळत होती ती १७० रुपयांनी महाग होऊन १६४० रुपयांना मिळत आहे. तर १२:३२:१६ या खताची १४९० रुपयांची पिशवी १६४० रुपयांना मिळत असून, १५० रुपयांनी महाग झाली. १६:२०:०:१३ या खताच्या किमतीत ५० रुपये वाढ झाली. अमोनियम सल्फेटची ८७५ रुपयांची पिशवी १२५ रुपयांनी महाग होऊन १ हजार रुपयांना मिळत आहे. १५:१५:१५:०९ या खताच्या किमतीत १९५ रुपयांची वाढ झाली.