कोल्हापूर : साखर कारखान्यांबरोबरच आता यापुढे इथेनॉल निर्मितीच्या डिस्टिलरी उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट घातली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय आज जाहीर केला.
यामुळे अस्तित्वात असलेल्यांबरोबरच नव्या सुरू होणाऱ्या डिस्टिलरीसाठी चांगले दिवस येणार असून, या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. देशात आणि राज्यातही दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कायद्याने निश्चित केले आहे.देशात दोन कारखान्यांमधील अंतर १५ किलोमीटर, तर महाराष्ट्रात ते २५ किलोमीटर आहे. पण, डिस्टिलरी उभारणीसाठी ही अट नव्हती. अलीकडे केंद्र सरकारने इंधनात इथेनॉल मिश्रणाला प्राधान्य दिले आहे. मिश्रणाचे प्रमाण १० टक्के करण्याचा तर २०१५ पर्यंत ते २० टक्के करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. त्यातून आवश्यक तेवढीच साखर उत्पादन होईल हा उद्देश आहे.
आज साखरेच्या उत्पादनाच्या प्रमाणात बाजारात मागणी नाही. त्याचा फटकाही कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे इंधनात इथेनॉल मिश्रणावर भर दिला आहे.
डिस्टिलरीचालकांना खांडसरीकडून इथेनॉल निर्मितीसाठी लागणारे बी व सी हेवीसह उसाचा रस हा कच्चा माल खरेदी करता येणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे. खांडसरी उभा करण्यासाठी केंद्राकडून हवाई अंतराची अट नाही. परिणामी, राज्यात असलेल्या सुमारे ६० खांडसरीतून हा कच्चा माल जाणार नाही.नव्या प्रस्तावांनाही अट लागूराज्यात गेल्या वर्षी सुमारे ११७ प्रकल्प सुरू होते. यावर्षी त्यात नव्याने २८ प्रकल्पांची भर पडली आहे. याशिवाय, आणखी काही प्रकल्प परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा नव्या प्रस्तावांनाही ही नवी अट लागू आहे.