कोल्हापूर महापालिकेतील कचरा घोटाळय़ाची चौकशी सुरू…डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील कचरा घोटाळय़ाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भाजपाच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई या चौकशीचे प्रमुख असून समितीत उपायुक्त रविकांत अडसूळ आणि सहाय्यक आयुक्त नियीन घार्गे यांचाही समावेश आहे.

महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरील सुमारे एक लाख टन कचरा परवानगीशिवाय कसबा बावडा परिसरातील काही शेतांमध्ये उघडय़ावर टाकण्यात आल्याची बाब भाजपच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवडय़ात उघडकीस आणली होती. याकरिता शेतकऱ्यांकडून एकरी चार लाख रुपये घेतले असल्याचा आरोप करून भाजपने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यावर पंचनाम्यामध्ये अशास्त्रीय आणि पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा पसरला असल्याचे आढळले असा स्पष्ट उल्लेख होता. परिणामी शेतात कचरा पसरण्याचा प्रकार थांबला असून प्रदूषण मंडळाने महानगरपलिकेवरील कारवाईसाठी अहवाल मुंबई कार्यालयास पाठविला आहे.