भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाणार?

मुंबई : भाजप आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. आज त्या अर्जाची विधानसभा उपाध्यक्षांकडून दखल घेण्यात आली असून निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. याबाबत आज दुपारी दोन वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

विधिमंडळाच्या जुलैमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक खेचणे आणि तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करणे, असे आरोप ठेवून गैरवर्तन करणाऱ्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर या आमदारांनी निलंबन मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने निलंबन मागे घेण्यास नकार दिला होता. या आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवून न्यायालयाने राज्य सरकार व विधिमंडळास बाजू मांडण्यास आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. येत्या ११ जानेवारीला म्हणजेच उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.