कोल्हापूर: आम आदमी पार्टीची अंगीकृत संघटना असलेल्या आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा निर्धार मेळावा शाहू स्मारक भवन येथे पार पडला. संघटनेचे मार्गदर्शक व ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई व पुणे जिल्हाध्यक्ष असगर बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
घरेलू कामगार, बांधकाम कामगार, माथाडी कामगारांचे कल्याणकारी मंडळ होऊ शकते मग रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ का होऊ शकत नाही असा सवाल ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी उपस्थित केला. कल्याणकारी मंडळाचा निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील दहा हजार रिक्षाचालकांना घेऊन कामगारमंत्री ना. हसन मुश्रीफ यांना घेराव घालू. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे देसाई यांनी सांगितले. दहा वर्षे शहराचे प्रतिनिधित्व करणारे कल्याणकारी मंडळासाठी पाठपुरावा करू असे सांगत आहेत. मागील दहा वर्षात हा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही, का फक्त पोटनिवडणूक जवळ आली म्हणून रिक्षाचालकांचा त्यांना कळवळा येतोय का असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
सवलतीच्या दरात रिक्षा इन्शुरन्स, आरटीओ पासिंग, परवाना नूतनीकरण यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम संघटनेने केले असल्याचे पुणे अध्यक्ष असगर बेग यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे पुणे सह-सचिव आनंद अंकुश यांनी अवाजवी रिक्षा इन्शुरन्स प्रीमियम अन्यायकारक आहे. ज्या वाहनाचा अपघात क्वचित घडतो, अशा रिक्षाचा इन्शुरन्स प्रीमियम चार चाकी वाहना इतका आकारला जातो. हा इन्शुरन्स कमी करण्यासाठी संघटना काम करणार असल्याचे सांगितले.
शहरातील रिक्षा स्टॉप वाढवण्यासाठी सातत्याने आवाज उठवून रिक्षाचालकांना संघटीत करत असल्याचे आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश गायकवाड यांनी मेळाव्यात सांगितले. कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना मृत पावलेल्या रिक्षाचालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे संघटक विजय भोसले, निसार सय्यद, वसंत मोरे, उमेश बागडे यांची भाषणे झाली. लाला बिरजे, मंगेश मोहिते, प्रकाश हरणे, संजय सूर्यवंशी, संभाजी देसाई, शकील मोमीन, प्रभाकर चौगुले, इसार पटेल, संभाजी मोरे आदी उपस्थित होते. विशाल वठारे यांनी प्रास्ताविक केले. बाबुराव बाजारी यांनी सूत्रसंचालन केले.