चाफळ येथील श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश

कराड | पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले चाफळ येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रातीला (दि. 14 जानेवारी) सीतामाईची यात्रा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडते.यादिवशी चाफळला मकर संक्रातीचे हळदी- कुंकू आणि अखंड साैभाग्याचा वसा घेण्यासाठी गर्दी करत असतात.

मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने चालू वर्षी सीतामाईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीराम देवस्थान ट्रस्टने घेताला आहे. तसेच यादिवशी मंदिर परिसरात 200 मीटर परिसरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे.पाटण तालुक्यातील चाफळ येथे श्रीरामाचे मंदिर आहे. राज्यासह देशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात मकर संक्रातीला सीतामाईची यात्रा 1985 पासून मोठ्या उत्साहात भरते. यादिवशी महिला साैभाग्याचा वसा घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.

या दिवशी कराड, पाटण तसेच सातारा येथील बस आगारातून भाविकांसाठी बसेसच्या फेऱ्याही वाढविल्या जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.शासन आदेशानुसार 14 जानेवारी रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी व महिलांनी चाफळला दर्शनासाठी येवू नये, असे आवाहन अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, व्यवस्थापक धनंजय सुतार व विश्वस्त मंडळाने केले आहे.