कोल्हापूर : इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH५१L चे 12 ऑगस्ट रोजीपासुन कामकाज सुरु करण्यात येत असून MH५१L पसंती क्रमांकाचे अर्ज 12 ते 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील.

MH५१L ही नवीन चार चाकी मालीका MH५१F ही मालिका सुरु असताना आगाऊ सुरु करण्यात आलेली आहे त्यामुळे MH५१L या मालीकेतील नंबरसाठी तीनपट शुल्क आकारण्यात येईल.
वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे-
पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेच्या तीनपट रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर स्विकारली जाणार नाही, असे अर्ज बाद समजण्यात येतील.
डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढताना DY REGIONAL TRANSPORT OFFICE, ICHALKARANJI या नावानेच काढलेला असावा इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहलेला असणे आवश्यक असेल. नवीन चार चाकी वाहनांच्या पसंती क्रमांकाबाबत 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) सादर करावा. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर पसंती क्रमाकांचे एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाले असतील अशा नोंदणी क्रमांकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
पसंती नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 14 ऑगस्ट रोजी करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते 4 या कालावधीत कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयात घेण्यात येईल.
मागणी अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, अशी माहिती इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले आहे.
