कबनूरमध्ये बेकायदेशीर पिस्तूल, २८ जिवंत काडतुसांसह एकाला अटक! स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरची मोठी कारवाई; ७४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : अवैध अग्निशस्त्रांविरोधात कोल्हापूर पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका कारखान्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, २८ जिवंत काडतुसे आणि अग्निशस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त करून एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

तुषार लक्ष्मण येरुडकर (वय २४, रा. दत्तनगर, गल्ली नं. १०, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

कारखान्याच्या आड सुरू होता पिस्तूल बनवण्याचा प्रयत्न!

 

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने दत्तनगर परिसरात सापळा रचून तुषार येरुडकर याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने दत्तनगर येथे भाड्याने घेतलेल्या व्हीएमसी (VMC) मशीनच्या कारखान्याची माहिती दिली.

या कारखान्यावर छापा टाकला असता, पोलिसांना तेथे थक्क करणारा साठा आढळून आला. आरोपी या कारखान्यात पिस्तूल बनवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला त्यात अद्याप यश आले नव्हते.

 

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

 

देशी बनावटीचे पिस्तूल: १ नग

 

जिवंत काडतुसे (राऊंड): २८ नग

 

रिकामी पुंगळी: ३ नग

 

इतर साहित्य: गन पावडर, पिस्तूल व काडतूस सदृश्य स्टीलचे सुटे पार्ट

 

एकूण किंमत: ₹७४,५००/-

 

कारवाई करणारे पोलीस पथक:

 

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव (म.पो.से.) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड (म.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार विनायक चौगुले, विशाल चौगुले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, सागर चौगुले, सतीश सूर्यवंशी आणि अरुण धनगर यांच्या पथकाने ही धडक कामगिरी केली.

जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीला पुढील कायदेशीर तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🤙 8080365706