इचलकरंजी : कोयता, तलवार घेऊन दहशत माजवत महिन्याला 50 हजारांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये मोका गुन्हा दाखल असलेल्या अभिषेक हिराप्पा तेरेणे वय 25, रा. कबनूर याचाही समावेश आहे.

या नऊ जणांना न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या 2 अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
पोलीस माहितीनुसार, येथील जवाहरनगरमधील लता माने यांच्या मुलाचा व्हिफिंग व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या स्पर्धेतून मोका गुन्हा दाखल असलेल्या आणि तुरुंगातून साडेचार वर्षांनी बाहेर आलेल्या अभिषेक तेरेणे आणि दक्ष शंकर वडर वय 20, शिवम वायुकुमार कोळेकर वय 27 दोघे रा. जवाहरनगर यांच्यासह 10 ते 12 जणांनी कोयता, तलवार घेऊन मंगळवारी रात्री माने यांच्या घरासमोर गोंधळ घालत दहशत माजवली.
सागर माने यांच्याकडून व्हिफिंग धंदा जोडून देण्यासाठी महिन्याला 40 हजारांची खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी यापैकी अभिषेक तेरेणे, दक्ष वडर, शिवम कोळेकर, इम्रान फारुख कल्लेगार वय 26, श्रेयस सुधीर शिंदे वय 18, मुबारक हुसेनसाब गलगली वय 18, याकूब बाबू नाईकवडी वय 28, दोघे रा. जवाहरनगर, यश विनायक गोंदकर वय 18, रा. स्वामी अपार्टमेंट, सूरज रामतीर्थ सुतार वय 23, रा. कबनूर या 9 जणांना अटक केली आहे.
संशयितांना न्यायालयात हजर केले असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुन्ह्यातील 2 अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
