कुरुंदवाड: मुलीला जन्म दिल्याचा राग, शिक्षक पतसंस्थेतून 20 लाख रुपयांचे कर्ज काढून न दिल्याचा राग आणि माहेरहून पैसे व दागिने आणण्यासाठी तगादा लावत एका शिक्षिकेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिक्षिका प्रणिता विनायक परीट वय 32, रा. ग्रामपंचायत जवळ, मजरेवाडी, ता. शिरोळ यांनी कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती विनायक बापूसो परीट वय 33, सासू संगीता बापूसो परीट वय 50 आणि सासरे बापूसो आण्णाप्पा परीट वय 60 सर्व रा. ग्रामपंचायत जवळ, मजरेवाडी, ता. शिरोळ अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, 5 जून 2021 ते 22 जुलै 2026 या कालावधीत मजरेवाडी येथील राहत्या घरी सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आला. फिर्यादीला पहिली व दुसरी मुलगी झाल्याचा राग मनात धरून पती, सासू व सासऱ्यांनी वारंवार वाद घालत मानसिक त्रास दिला.
तसेच शिक्षक पतसंस्थेतून 20 लाख रुपयांचे कर्ज काढून देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. कर्जाची मागणी पूर्ण न केल्याने माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी तगादा लावत शारीरिक व मानसिक त्रास देत दुसरा विवाह करण्यासाठी अखेर घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
