कोल्हापूर : राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते भरत लाटकर यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजवादी आणि विज्ञाननिष्ठ विचारांसाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या लाटकर सरांनी मृत्यूनंतर देहदानाचा निर्णय घेऊन मानवतेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला.

समाजासाठी समर्पित असलेल्या त्यांच्या जीवनाचा हा शेवटचा निर्णय प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या देहदानामुळे वैद्यकीय क्षेत्राला आणि समाजाला मोठी मदत होणार आहे.
आज कोल्हापुरात त्यांच्या अंत्ययात्रेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी आ. सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सहभागी होऊन लाटकर सरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
याप्रसंगी त्यांचे सुपुत्र आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, कुटुंबीय, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच लाटकर सरांच्या समाजकार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
भरत लाटकर यांचे निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून, पुरोगामी विचारांच्या चळवळीची मोठी हानी आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
