जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेचा कृषी – पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा होय असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.

 

शासकीय विश्रामगातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा वार्षिक योजना सन 2026 – 27 चारा उत्पादन कार्यक्रमातर्गंत,पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष, श्रीमती शिल्पा खोत,जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.जॅसमिन,कृषी-पशुसंवर्धन व दुग्ध समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील,बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर,महिला बाल कल्याण सभापती विद्या पाटील,शिक्षण सभापती शितल यादव,समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प संतोष जोशी, आदी उपस्थित होते .

कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे त्याचबरोबर या जिल्ह्यात कृषी संपन्नता आहे . त्यामुळे या ठिकाणी पाळीव पशूंचे अनन्य साधारण महत्त्व आहे.शेतकऱ्यांनी हे पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासावे.तसेच दुग्ध व कृषी क्षेत्रातून शेतकऱ्यांनी स्वतःसह कुटुंबियांचे अर्थाजन करावे असा सल्ला देवून,लोकहिताची सच्ची चळवळ म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाहावे असे आवाहन ही पालकमंत्री श्री आबिटकर यांनी याप्रसंगी केले .

या कार्यशाळेच्या अनुषंगाने, पशुधनातील आहाराचे व्यवस्थापन या विषयावर सहा.आयुक्त डॉ. सॅम लुद्रिक,निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा निर्मिती या विषयावर सहा.आयुक्त डॉ. अविनाश चव्हाण तर पशुधनाच्या वंधत्व निवारणामध्ये चारा पिकांचे महत्त्व या विषयावर करवीर तालुक्यातील पवैद सांगरूळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.यशवंत उमरदंड यांनी उपस्थित पशु पालकांना अतिशय मौलिक व अभ्यासपूर्ण असे समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक तालुक्यातून दोन या प्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हयातील उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मका बियाणांचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक करताना डॉ. प्रमोद बाबर म्हणाले, आपल्या जिल्ह्यात सुमारे साडे आठ लाखांहून अधिक पशुधन आहे .तसेच सकस हिरवा चारा निर्मितीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ .प्रसाद भामरे यांनी केले.

या एक दिवसीय कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य,सर्व विभाग प्रमुख, पशुसंवर्धन विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी पशुधन सांभाळणारे जिल्हयातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706