कोल्हापूर : पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने कोल्हापूर शहराने मोठी झेप घेतली असून, केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेत. या प्रकल्पांतर्गत जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रा.लि. यां कंपनीसोबत कन्सेशन अॅग्रीमेंटची कार्यवाही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या रस्त्यांवर धावणार असल्याचा विश्वास परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यामुळे अत्याधुनिक, वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त बससेवेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतुकीत नवा अध्याय सुरू होणार आहे.

केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत कोल्हापूर महानगरपालिकेला ९ मीटर लांबीच्या ५० आणि १२ मीटर लांबीच्या ५० अशा एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून, परिवहन समिती सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्यजित जाधव यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या योजनेअंतर्गत सिव्हील डेपो डेव्हलपमेंटसाठी तब्बल १७.१८ कोटी रुपये, तर Behind the Meter Power Infrastructure साठी १७.५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून डेपो उभारणीचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून, पुढील आठवड्यात संपूर्ण डेपो परिसरातील पेव्हमेंटचे कामही पूर्ण होणार आहे. महाडिस्कॉमकडून ३३ केव्ही क्षमतेच्या १० किलोमीटर अंडरग्राऊंड एचटी लाईनचे काम पूर्ण झाले असून, एलटी लाईनचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. तीन ट्रान्स्फॉर्मरपैकी दोन ट्रान्स्फॉर्मर उभारण्यात आले असून, उर्वरित ट्रान्स्फॉर्मर आठ दिवसांत बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी बस ऑपरेटर म्हणून जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रा.लि. या कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीसोबतच्या कन्सेशन अॅग्रीमेंटची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी २२ मे रोजी त्यास अंतिम मंजुरी दिली आहे. तसेच डेपो अलॉटमेंटचे पत्रही कंपनीला देण्यात आले असून, पुढील पंधरा दिवसांत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी डेपो प्रत्यक्ष हस्तांतरित केला जाणार आहे.
परिवहन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पहिल्या टप्प्यातील इलेक्ट्रिक बसेस ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. या बसेस मार्गस्थ झाल्यानंतर शहरातील नागरिकांना आधुनिक, वातानुकूलित, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे डिझेलवरील खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पोवार, मानसी लोळगे, रोहन अतिग्रे, श्रीधर गाडगीळ, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, संतोष लाड, प्रशांत मोरे, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके यांच्यासह अति. परिवहन व्यवस्थापक डॉ. विजय पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, प्रकल्प विभाग प्रमुख पी. एन. गुरव आणि केएमटीचे अधिकारी उपस्थित होते.
