कोल्हापूर:सदर आरोपी प्रसाद विनायक धर्माधिकारी हा कोट्यवधींचा घोटाळा करून आणि सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून दिनांक २० मे २०२५ रोजी आपल्या राहत्या घरातून पसार झाला आहे.

साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये शहरातील जवळपास सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांवर यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्या. पण नेहमीप्रमाणे बराच गवगवा झाल्यावर थोड्या दिवसानंतर सर्व काही शांत झाले.
या सर्वात उठून दिसणारी बाब म्हणजे पोलिसांची कमालीची निराशाजनक कामगिरी. बाकी तपास राहिला बाजूला पण जवळपास वर्षभर होत आले तरी पोलिसांना संबंधितांना अजून साधी अटकही करता येऊ नये हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. कोल्हापूर पोलिसांच्या एकूण कार्यक्षमतेवर यामुळे एक फार मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या आर्थिक फसवणुकीमध्ये अनेक सर्वसामान्य आणि अक्षरशः हातावर पोट असणारे लोक अडकले आहेत. याच बरोबर ज्यांनी काही कारणांमुळे पोलिसात अद्यापपर्यंत तक्रारच दाखल केली नाही आहे अशांचीही संख्या लक्षणीय आहे. एकूण फसवणुकीचा आकडा हा किमान ५ कोटींपर्यंत असावा अशी शक्यत वर्तवण्यात येत आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदर व्यक्तीने पसार होण्यापूर्वीच आपले राहते घर (जे मिरजकर तिकटीच्या अत्यंत मोक्याच्या जागी असून त्याची किंमत सुमारे एक कोटी इतकी आहे) आपल्या एका जवळच्या मित्रास विकले आहे. इतके गंभीर प्रकरण असूनही या प्रकरणातील पोलिसांची निष्क्रियता बुचकळ्यात टाकणारी आहे.
दरम्यान सदर आरोपीची पत्नी सौ. अश्विनी प्रसाद धर्माधिकारी जी या केसमध्ये सह आरोपी आहे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी स्वतः हजर न राहता वकिलामार्फत ( अर्थात त्यांना अटक करण्यात पोलिस पूर्णतः अपयशी ठरल्यामुळे) जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता जो दिनांक १३/०२/२०२६ रोजी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तथापि आता त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. निदान आता तरी पोलिसांनी जागे होऊन लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात अशी अपेक्षा गुंतवणूकदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
