कोल्हापूर:माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत नऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार आणि बांधकामे करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळेच मी सलग गेली ३० वर्षे आमदार होऊ शकलो व त्यापैकी २२ वर्षे मंत्रीपदावर राहू शकलो. त्या सर्व देवतांची पुण्याई आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्या सर्व देव देवतांचे मनःपूर्वक आभार, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.

बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथे ७५लाख रुपये निधीतून बांधलेल्या श्री. भावेश्वरी देवी मंदिराच्या वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जरी मी कागल मध्ये राहत असलो तरी याच गावच्या हद्दीमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या रूपाने भव्य प्रकल्प उभा राहिलेला आहे. त्यामुळे ही आपली खऱ्या अर्थाने कर्मभूमी आहे. काळम्मा बेलेवाडी हे गाव आपण दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावचा सर्वांगीण विकास करणे हे आपले कर्तव्य आहे. येथील सर्व विकासकामे केली आहेत. पण ग्रामदैवत भावेशरी मंदिर जीर्ण झाले होते. त्याच्या जिर्णोद्धारासाठी आपला ७५ लाखाचा सर्व निधी दिला आहे. असे जरी असले तरी ग्रामस्थांनी एक सुंदर आणि दर्जेदार मंदिर उभे केले आहे. याचा आपल्याला आनंद आहे. या गावांमध्ये आपण अनेक वेळा आलो, आज या मंदिराचा वास्तुशांती आणि लोकार्पण सोहळा होत आहे. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून माहेरवाशीनीं सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. या सर्वांना आपणाकडून शुभेच्छा.
यावेळी देवस्थान उपसमिती चे अध्यक्ष हरी पाटील, विजय पाटील, पुंडलिक पाटील, रघुनाथ पाटील, सागर पाटील, शशिकांत देसाई, विनोद मुदाळकर, मोहन पाटील, बाजीराव पाटील, विठ्ठल पाटील, रंगराव पाटील, तानाजी पाटील यांच्यासह सर्व देवस्थान सदस्य व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डी. बी. कांबळे यांनी केले.
