शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, दोघा संशयितांना अटक, उचगावपैकी मणेर मळ्यातील घटना

कोल्हापूर:गांधीनगर, ता.९ः दारु पिऊन शिवीगाळ केल्याने उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यात प्रशांत बाबूराव पंडित (वय ३८, रा. यादववाडी, उचगाव) या रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याबद्दल यश दीपक दोरकर (वय २१, रा. यादववाडी, उचगाव) आणि अमित खुदबुद्दीन आयनापुरे (वय २२, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी गांधीनगर पोलीसांत गु्न्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अर्चना प्रशांत पंडित यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, प्रशांत हा रिक्षाचालक असून येथील मणेर मळा रिक्षा स्टॉपचा तो माजी अध्यक्ष आहे. आई, वडिल, पत्नी आणि एका मुलासह तो यादववाडी येथे राहतो. काल सायंकाळी प्रशांत हे घरातून बाहे गेले परंतु घरी परतले नाहीत. आज सकाळी येथील हनुमान मित्रमंडळाच्या खोलीच्यामागे प्रशांतचा मृतदेह सापडून आला. डोक्यात दगड घालून खून झाल्याचे आढळून आले. खून झाल्याची घटना परिसरात पसरताच बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी तातडीने श्वानपथक पाचारण केले. यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळे आणि पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि विशाल खराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा खून यश दोरकर आणि अमित आयनापुरे यांनी केल्याचे समजले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि संतोष गळवे यांच्या पथकाने भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना गुन्ह्याबाबत विचारले असता प्रशांतने शिवीगाळ केल्याने त्याला दगडाने ठेचून मारल्याचे त्यांनी सांगितले. या संशयित आरोपींना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार, वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदिप पाटील, अमित मर्दाने, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, संदिप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, अरविंद पाटील, अमित सर्जे, संजय हुंबे, सत्यजित तानुगडे, रोहित मर्दाने, रामचंद्र कोळी, वसंत पिंगळे, सतिश सूर्यवंशी, राजेश राठोड, महादेव कुराडे यांनी ही कामगिरी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत.
————

🤙 8080365706