पेरणोली:दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांचे आजरा तालुक्यासाठी प्रचंड योगदान आहे. आंबेओहोळ, उचंगी, सर्फनाला हे प्रकल्प त्यांचीच देणगी आहे. या प्रकल्पांच्या निविदा त्यांच्याच जलसंपदा मंत्रीपदाच्या काळात झाल्या. आजरा साखर कारखाना संकटात आल्यावर तो पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनीच सव्वाशे कोटींचे कर्ज एनसीडीसीकडून मिळवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांसह कामगारांचे हाल थांबले. पेरणोली मतदार संघातील सर्व उमेदवारांचे प्रचंड मताधिक्याने विजय हीच कै. अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पेरणोली ता. आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार सुधीरभाऊ देसाई, पेरणोली पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. यशोदा पोवार, वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार राजू होलम यांच्या प्रचारार्थ पेरणोलीमध्ये आयोजित जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पेरणोली मतदार संघातील वाड्यावस्त्यांचे रस्ते, वन्यजीवांपासून नागरिकांचे संरक्षण, शेतकऱ्यांना मोबदला या सर्व प्रश्नांसाठी वनमंत्री गणेश नाईक आणि जिल्हास्तरावर बैठक घेऊन हे प्रश्न निकालात काढू.
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, विरोधक प्रत्येक निवडणुकीत रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आजरा, चंदगड, गडहिंग्लज या सुसंस्कृत भागात बेकायदेशीर व्यवसाय व दहशतीमुळे तरुणाईला बिघडवण्याचे सुरू असलेले काम रोखूया. या भूमिकेतूनच मी आणि डाॅ. नंदाताई बाभुळकर एकत्र आलो असून राग, रुसवे, मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकदिलाने लढत आहोत.
डॉ. नंदाताई बाबुळकर म्हणाल्या, आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहोत. विधानसभेला आमच्या मतांची विभागणी झाली आणि आम्ही चुकीच्या पदरात आमदारकी टाकली. आमच्या या चुकीची जाणीव होऊन आम्ही एकदिलाने एकत्र आलो आहोत.
अनुभवाची जोड आणि विकासाची ओढ…..!
जिल्हा परिषद उमेदवार श्री. सुधीरभाऊ देसाई म्हणाले, सरपंचपदापासून साखर कारखाना संचालक, केडीसीसी बँक संचालक पदापर्यंत वाटचाल करणारा गावगाड्याची माहिती असलेला मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. पदे उपभोगणारा नव्हे तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने पदे जनसामान्यांसाठी राबविणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. अनुभवाची जोड आणि विकासाची ओढ घेऊन मी या जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरलो आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातही श्री. मुश्रीफ मंत्री असतील……!
शिवसेना नेते विजय देवणे म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचे नशीबच मोठे आहे. कुणाचेही मंत्रिमंडळ असो, त्यामध्ये ते मंत्री असणारच. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते होते. एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातही ते होते. आता देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही आहेतच. भविष्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाराष्ट्रात येऊन मंत्रिमंडळ स्थापन केले तर त्यामध्येसुद्धा ते असतीलच.
यावेळी शिवसेना नेते विजयराव देवणे, कॉम्रेड संपत देसाई, विजय काळे, संभाजीराव पाटील, मुकुंददादा देसाई यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख अनिल फडके, उदयदादा पोवार, एम. के. देसाई, सुभाष देसाई, दिगंबर देसाई, सुरेश होडगे, निवृत्ती कांबळे, विठ्ठलराव देसाई, अनिकेत कवळेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
